अण्णा हजारेंकडून टीकेचा समाचार, उद्धव ठाकरे-संजय राऊतांना दिले प्रत्युत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:10 IST2025-02-11T16:09:09+5:302025-02-11T16:10:09+5:30

Anna Hazare Replied Uddhav Thackeray And Sanjay Raut: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला अण्णा हजारेंनी प्रत्युत्तर दिले.

anna hazare replied thackeray group chief uddhav thackeray and sanjay raut over criticism | अण्णा हजारेंकडून टीकेचा समाचार, उद्धव ठाकरे-संजय राऊतांना दिले प्रत्युत्तर; म्हणाले...

अण्णा हजारेंकडून टीकेचा समाचार, उद्धव ठाकरे-संजय राऊतांना दिले प्रत्युत्तर; म्हणाले...

Anna Hazare Replied Uddhav Thackeray And Sanjay Raut: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. यामध्ये भाजपाने प्रचंड मोठा विजय मिळवत आम आदमी पक्षाला चितपट केले. या रणधुमाळीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुका २०२५ निकालानंतर प्रतिक्रियाही दिली होती. परंतु, यातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा अण्णा हजारे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचे काम अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी केले. अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती? रामलीला मैदान, जंतर-मंतर रोड कधी पाहिला असता? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहिती झाले, नाही तर ते राळेगणचे दैवत होते. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचे सरकार असेल, त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही, हे दुर्दैवाने सांगायला लागत आहेत. भ्रष्ट सरकारच्या बाजूने ते उभे राहिले. अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. याला अण्णा हजारेंनी मोजक्या शब्दांत पण थेट उत्तर दिले आहे. 

ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते

संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे. मग जग तसंच दिसणारच. तसेच दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर बोलताना, दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून मी केवळ उत्तर दिली. एरवी मी राजकीय विषयांवर बोलत नाही. पण दिल्लीच्या निकालाबाबत सगळ्यांनीच प्रशंसा केली, एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्यावे. आपण कशाला त्यावर बोलायचे, असे खोचक उत्तर अण्णा हजारेंनी दिले.

दरम्यान, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २७ वर्षांनंतर भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव झाला. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला. तसेच सलग तिसऱ्यांदा काँग्रेसचा एकही जागा मिळाली नाही. ७० पैकी तब्बल ६७ ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले.
 

Web Title: anna hazare replied thackeray group chief uddhav thackeray and sanjay raut over criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.