“मुख्यमंत्री काहीच बोलत नाही, लोकायुक्त कायद्यासाठी रान पेटविणार”; अण्णा हजारेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:53 AM2022-05-16T05:53:29+5:302022-05-16T05:54:18+5:30
लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्यासाठी पुन्हा एकदा रान पेटविण्याची घोषणा केली आहे. अडीच वर्षांपूर्वी लोकायुक्त कायदा करू, असे लेखी आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता याविषयी बोलतही नाहीत. याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी घडलंय, असा आरोप हजारे यांनी केला आहे.
भ्रष्टाचार जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर राळेगणसिद्धीत झाले. त्याच शिबिरात अण्णांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला. त्यानंतर रविवारी माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटूनदेखील त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यावर बोलायलासुद्धा तयार नाहीत. नेमके या कायद्याबद्दल काय झाले, हे कळायला मार्ग नाही. काय घडले? कोणी जादू केली? ठाकरे कसे बोलायचे बंद झाले? या विषयी मला माहिती नाही.