“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 18:14 IST2025-02-05T18:11:29+5:302025-02-05T18:14:31+5:30
Anna Hazare News: दिल्लीत आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपा आणि काँग्रेसनेही सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका
Anna Hazare News: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७ टक्के मतदान झाले होते. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिहेरी लढत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान झाले असून, ०८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकमेकांविरोधात प्रचंड टीका, आरोप-प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
मीडियाशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, अरविंद केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पार्टीच्या नादात अरविंद केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला. सुरुवातीला अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होता, तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते, असे अण्णा हजारेंनी स्पष्टपणे सांगितले.
...तेव्हापासून मी त्याची साथ सोडली
राजकारण आणि पक्ष काढायच्या मागे लागला. अरविंद केजरीवाल यांनी पार्टी काढली, तेव्हापासून मी त्याची साथ सोडली. मला समजले की हा स्वार्थी आहे. सुरुवातीला त्याचे आचार-विचार चांगले होते. तेव्हा राजकारण, पार्टी हे विषय त्याच्या डोक्यातही नव्हते. आता हेच दारूबाबत बोलत आहेत. दारूसाठी आम्ही आंदोलन केले होते, त्यावेळी अरविंद केजरीवाल आमच्यासोबत होते. आता तेच दारूबाबत बोलत आहेत. त्यामुळे मी त्याला सोडून दिले. काही लोक सांगतात की, अण्णा हजारे यांच्यामुळे ते आले. मात्र, ही गोष्ट चुकीची आहे. सुरुवातीला तो चांगला माणूस होता, नंतर मला जेव्हा समजले तेव्हा मी त्याच्यापासून दूर झालो, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६९९ उमेदवारांच्या भवितव्याचा कौल मतदान यंत्रातून देण्यात आला. आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपा आणि काँग्रेसनेही दिल्लीत सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी आपल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे २५ वर्षांहून अधिक काळ दिल्लीतील सत्तेतून बाहेर असलेल्या भाजपाने यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसत आहे.