Anna Hazare: 'वाईन विक्री'च्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला मोठा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 06:31 PM2022-02-05T18:31:08+5:302022-02-05T18:31:37+5:30
महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई-
महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे.
किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईक विक्रीच्या परवानगीचा निर्णय राज्यातील जनतेसाठी अतिशय दुर्देवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय जर मागे घेतला नाही तर बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Social activist Anna Hazare writes to Maharashtra CM Uddhav Thackeray against the state govt's decision to allow the sale of wine in supermarkets and walk-in shops.
— ANI (@ANI) February 5, 2022
In the letter, Hazare also warned the state govt to go on infinite strike against the decision. pic.twitter.com/gaMikXf6lr
वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते, असं अण्णा हजारे यांनी याआधी म्हटलं होतं. आता थेट मुख्यमंत्र्यांना याबाबतचा पत्र व्यवहार करुन अण्णांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार?, असा सवालही अण्णांनी विचारला आहे.