अण्णा हजारेंची पोलिसांकडे तक्रार
By admin | Published: February 2, 2017 01:32 AM2017-02-02T01:32:03+5:302017-02-02T01:32:03+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर साखर कारखाना विक्री कथित घोटाळा प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर साखर कारखाना विक्री कथित घोटाळा प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जावरुन तपास सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी साखर कारखाना आणि सहकार घोटाळा केल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मात्र संबंधित यंत्रणेकडे तक्रार न करता जनहित याचिका दाखल केल्यामुळे या याचिकेवर सुनावणी घेतली जाऊ शकत नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना याबाबत संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचे निर्देश दिले होते. त्याच निर्देशानुसार बुधवारी हजारे यांनी मुंबई पोलिसांची भेट घेतली. (प्रतिनिधी)