'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या'...अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:09 PM2019-01-21T12:09:20+5:302019-01-21T16:13:23+5:30
करेंगे या मरेंगे चा नारा देत महात्मा गांधी पुण्यतिथी ( दि. ३० जानेवारी ) पासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
राळेगण सिद्धी : राज्याला देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री मिळाले, असे कौतुक आपण करीत होतो. परंतु, सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा झाला नाही. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची अवस्था झाल्याची कठोर शब्दांत टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
राळेगण सिद्धी येथे रविवारी आयोजित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्त प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने महात्मा गांधी पुण्यतिथी ( दि. ३० जानेवारी) पासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषण करण्याचा निर्धार अण्णांनी पुन्हा व्यक्त केला. हजारे म्हणाले, नवी दिल्लीत रामलीला मैदानावर गत वर्षी शहीद दिनी उपोषण केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्त प्रश्न सोडविण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. परंतु, गेल्या ९ महिन्यांत त्याचे पालन केले नाही. देशात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवीत नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, वयोवृद्ध शेतकऱ्यांना ५ हजार रूपये निवृत्तीवेतन या प्रश्नी सरकार दिशाभूल करीत आहे. लोकपाल कायदा होऊन पाच वर्षे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन पाच वर्षे पुर्ण होण्याची वेळ आली तरी त्यांनी लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीत चालढकल करीत जनतेची दिशाभूल केली. लोकपाल कायदा झाल्यानंतर १ वर्षांच्या आत राज्यात लोकायुक्त कायदा होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही कार्यवाही केली नाही. देशातील कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धी येथे न येता आपापल्या भागात आंदोलन करावे. या वेळी अशोक सब्बन, बालाजी कुंपलवार, अॅड. शाम असावा आदींसह कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
गांधीजींच्या पुण्यतिथीपासून आंदोलन करणार
शेतक-यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणी या ज्वलंत प्रश्न न सोडविणारे हे सरकार लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालले असल्याने आंदोलनानेच सरकारला जाग येईल. त्यामुळे करेंगे या मरेंगे चा नारा देत महात्मा गांधी पुण्यतिथी ( दि. ३० जानेवारी ) पासून राळेगण सिद्धी येथे आपण आमरण उपोषण करीत आहोत.
-अण्णा हजारे,ज्येष्ठ समाजसेवक
आंदोलनाची जनजागृती
आंदोलनाच्या जनजागृतीसाठी अण्णा हजारे सोमवारी ( दि. २१ ) नवी दिल्लीचा दौरा करणार आहेत. देशातील विविध संघटनांच्या निवडक कार्यकर्त्यांची पुन्हा दि. २४ जानेवारी रोजी बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. या शिवाय कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात आंदोलनाची जनजागृती करण्याचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या बैठकीत ठरले आहे.