अण्णा हजारेंची मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका, क्लोजर रिपोर्टला विरोध, कथित शिखर बँक घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:53 AM2021-02-20T02:53:33+5:302021-02-20T06:36:27+5:30
Anna Hazare : ऑक्टोबर २०२० मध्ये ईओडब्ल्यूने २५,००० कोटी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. हा अहवाल स्वीकारू नये, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष एसीबी न्यायालयात निषेध याचिका दाखल केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकार बँक कथित घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारू नये, यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुंबई सत्र न्यायालयात निषेध (प्रोटेस्ट) याचिका दाखल केली आहे.
ऑक्टोबर २०२० मध्ये ईओडब्ल्यूने २५,००० कोटी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. हा अहवाल स्वीकारू नये, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष एसीबी न्यायालयात निषेध याचिका दाखल केली आहे.
त्यांनी केलेल्या याचिकेनुसार, त्यांनी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी क्रॉफर्ड रोड येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. मात्र, अद्याप पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला नाही आणि आरोपींची चौकशी न करताच पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला.
या प्रकरणी दुसरे तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करताच पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सहकारी साखर कारखान्यांच्या भागधारकांचेही जबाब नोंदविण्यात आले नाहीत. तसेच कॅग, नाबार्डने सादर केलेले अहवाल विचारात घेण्यात आला नाही, असे हजारे यांनी याचिकेत म्हटले आहे. आज, शनिवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.