अण्णांना पदावरून हटविले
By Admin | Published: January 8, 2016 03:41 AM2016-01-08T03:41:12+5:302016-01-08T03:41:12+5:30
भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह सर्व विश्वस्तांना राळेगणसिध्दी येथील ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास’ या संस्थेच्या विश्वस्तपदावरून हटवून
पुणे : भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह सर्व विश्वस्तांना राळेगणसिध्दी येथील ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास’ या संस्थेच्या विश्वस्तपदावरून हटवून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या नावातील ‘भ्रष्टाचार’ हा शब्द न वगळल्याने धर्मादाय सहआयुक्तांनी ही कारवाई केली.
भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे हे शासनाचे काम आहे. त्यामुळे कोणत्याही संघटना, संस्था आपल्या नावामध्ये ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ हे शब्द वापरू शकत नाहीत. त्यामुळे असे शब्द असलेल्या संस्थांनी नावात बदल करून संबंधित शब्द त्वरीत हटवावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ शब्द असलेल्या आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या संघटनांना सहआयुक्तांनी नोटिसा पाठवली होती.
हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेच्या नावातही ‘भ्रष्टाचार’ हा शब्द असल्याने तो बदलण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र नावात बदल करण्यात आला नाही. त्यामुळे धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ६९, कलम ३ अ व ५० अ नुसार संघटनेच्या विश्वस्तांवर कारवाई करीत हजारे यांच्यासह सर्व विश्वस्तांना निलंबित केले. तसा आदेश गुरुवारी काढला. हजारे यांच्या वतीने त्यांचे म्हणणे अॅड. मिलिंद पवार यांनी मांडले. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत विश्वस्त निलंबित राहणार असल्याने आदेशात म्हटले आहे.