अण्णासाहेब जगतापने पटकावला महापौर कुस्ती चषक
By admin | Published: March 7, 2017 02:19 AM2017-03-07T02:19:06+5:302017-03-07T02:19:06+5:30
महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या अण्णासाहेब जगताप याने स्पर्धेचे खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने आयोजित महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या अण्णासाहेब जगताप याने स्पर्धेचे खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे.
भोलानाथ साळवी हा कुमार गटातील स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. कोपरखैरणेत दोन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील २८० कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानावर कुस्तीचा भव्य आखाडा उभारण्यात आला होता. त्याठिकाणी दोन दिवस कुस्तीचे अटीतटीचे सामने खेळले जात होते. या सामन्यांची अंतिम फेरी रविवारी झाली. यामध्ये खुल्या गटाच्या महापौर चषक स्पर्धेत सोलापूरच्या अण्णासाहेब जगताप याने सोलापूरच्याच गणेश जगताप याला चीतपट करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर अठरा वर्षांखालील कुमार गटातून भोलानाथ साळवी याने अजय भोईर याच्यावर मात करत मैदान मारले. या दोन्ही विजेत्यांसह उपविजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अण्णासाहेब जगताप याला १ लाख रुपये, मानाचा पट्टा व चांदीची गदा पुरस्कार स्वरूपात देण्यात आली. तर भोलानाथ साळवी याला १५ हजार रुपये व चांदीची गदा देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमास समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती रमेश डोळे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती उपसभापती श्रध्दा गवस, नगरसेवक देविदास हांडे पाटील,सुनील पाटील, नगरसेविका छाया म्हात्रे, वैशाली नाईक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे, खजिनदार सुरेश पाटील, महापालिका क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, मारुती आडकर आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील कुस्तीगिरांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महापालिकेतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
कुस्तीमध्ये महिलांचाही वाढता प्रतिसाद पाहता, ठाणे व रायगड जिल्हास्तरीय विशेष गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत मनाली जाधव हिने भाग्यश्री भोईर हिच्यावर मात करत विजेतेपद पटकाविले, तर ममता राठोड हिने तृतीय व मोनिका चिकणे हिने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. (प्रतिनिधी)
खुल्या गटाच्या स्पर्धेत सोलापूरचा दत्ता नरळे हा तिसरा, सांगलीचा रणजित पवार चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
कुमार गटात विकास पिसाळ तिसऱ्या तर दर्शन पाटील हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
त्याशिवाय ५५ ते ६५ किलो वजनी गटातून राहुल जाधव हा विजेता ठरला असून, विकास कदम उपविजेता, सुधीर पाटील तृतीय तर नानासाहेब होनमाने चतुर्थ क्रमांकाचा विजेता ठरला आहे.
४५ ते ५० किलो वजनी गटातून शरद साठे विजेता, चेतन मालपुरे उपविजेता, दीपक मालपोटे तृतीय, यश पाटील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
६१ ते ७० किलो गटातून लखन म्हात्रे विजेता, विजय म्हात्रे उपविजेता, मंगेश पाटील तृतीय तर भरत हरगुले चौथ्या क्रमांकाचा विजेता ठरला आहे.
४५ ते ५० किलो वजनी गटातून दर्शन पाटील प्रथम, अनिकेत मढवी द्वितीय, विवेक भंडारी तृतीय तर चेतन चव्हाण चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
६५ ते ७४ किलो राज्यस्तरीय गटातून सांगलीच्या प्रकाश कोळेकर याने नवी मुंबईच्या नितीन संकपाळ याच्यावर मात करत गटाचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत विजय पाटील तृतीय तर विजय सुरडे चौथ्या क्रमांकाचे विजेते ठरले आहेत.