अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाख रुपये, नरेंद्र पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:43 PM2022-10-20T15:43:04+5:302022-10-20T15:44:01+5:30

वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही नरेंद्र पाटील यांनी दिली.

Annasaheb Patil Mahamandal's interest repayment scheme limit is Rs 15 lakh, information from Narendra Patil | अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाख रुपये, नरेंद्र पाटलांची माहिती

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाख रुपये, नरेंद्र पाटलांची माहिती

googlenewsNext

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखांवरून १५ लाख करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही नरेंद्र पाटील यांनी दिली.

नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच पहिल्या दिवशी राज्यातील ३ हजार ७२७ लाभार्थ्यांना २ कोटी ९७ लाख एवढा व्याज परतावा वितरीत केला आहे. महामंडळातर्फे व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. त्याचबरोबर, सीसी आणि ओडी कर्जांतर्गतचा व्याज परतावा पुन्हा सुरु करण्यात आला आहे, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जांना राज्य सरकारतर्फे हमी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर ही हमी पुन्हा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मराठा समाजातील तरुणांना मोठा फायदा होणार आहे, असे नरेंद्र पाटील यांनी नमूद केले. 

याचबरोबर, महामंडळाच्या कर्ज योजनातून एक लाख मराठा उद्योजक तयार करू असे सांगत नरेंद्र पाटील म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच, सारथी आणि महाज्योती महामंडळांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नाशिक येथे मुलींचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Annasaheb Patil Mahamandal's interest repayment scheme limit is Rs 15 lakh, information from Narendra Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.