भाजपाने सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीदिवशी लावला पुण्यतिथीचा बॅनर
By admin | Published: November 1, 2016 03:54 PM2016-11-01T15:54:48+5:302016-11-01T15:54:48+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी जयंतीऐवजी पुण्यतिथी लिहून हसू करुन घेतलं
Next
>ऑनलाइन लोकमत
डहाणू, दि. 1 - एकीकडे देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांची 141वी जयंती साजरी करत असताना भाजपा कार्यकर्ते मात्र पुण्यतिथी साजरी करत होते. भाजपाकडून लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी असल्याचं लिहिण्यात आलं होतं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी जयंतीऐवजी पुण्यतिथी लिहून हसू करुन घेतलं. हे बॅनर संपुर्ण शहरात लावण्यात आले होते.
भाजपाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान केला असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नगरसेवक सय्यद अब्दुल रशीद शेख यांनी पोलिसांकडे केली आहे. भाजपाने लगेच आपली चूक मान्य करत सुधारली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबरला भाजपातर्फे डहाणू स्वच्छ अभियान राबवण्यात येणार होतं. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रमाचे बॅनर लावताना त्यावर जयंतीऐवजी पुण्यतिथी छापण्यात आलं आणि त्यांची गफलत झाली. काँग्रेस नगरसेवक सय्यद अब्दुल रशीद शेख यांनी यासंबंधी पोलिसांकडे तक्रार करत जाणुनबुजून ही चूक केल्याचा आरोप केला. पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. भाजपा नेते भारत राजपूत यांनी चूक मान्य केली असून कार्यकर्त्यांनी चुकून केल्याचं सांगितलं आहे.