गोदावरी कालव्यांची आवर्तने जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 04:33 AM2016-10-31T04:33:15+5:302016-10-31T04:33:15+5:30
गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीन औताडे यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली
कोपरगाव (अहमदनगर) : गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नितीन औताडे यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली आहे. कोपरगाव व राहाता तालुक्यात मागील चार वर्षांपासून पर्जन्यमान घटल्याने जमिनीच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे.
गंगापूर व दारणा धरणांवरील गोदावरी कालव्यांद्वारे शेतीला पाणी दिले जाते. तर ओव्हरफ्लोच्या पाण्यावर ओढे, नाले, बंधारे अवलंबून आहेत. २00५ सालच्या समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे धरण समूहावर पावसाचे प्रमाण समाधानकारक असूनही गोदावरी कालव्यांवरील एस्केप सोडले गेले नाहीत. शेतकऱ्यांनी खरिपाची पिके पावसाच्या पाण्यावर केलेली असताना गोदावरी कालव्यांचे पाणी किती व केव्हा देणार, याचे नियोजन करण्यात आले नाही.
साखर कारखाने ऊस लागवडीचा आग्रह धरीत आहेत. पुढील काळात नेमकी कोणती पिके घ्यायची, हे कालव्यांच्या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर झाल्याशिवाय करता येणार नाही. म्हणून गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामाची ३ व उन्हाळी २ आवर्तने देण्याची मागणी औताडे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)