गाढवांच्या गळ्यात संजय राऊत, आव्हाड यांच्या नावाची पाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:54 PM2020-01-16T12:54:28+5:302020-01-16T12:54:33+5:30
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरूवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
सातारा : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरूवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावा द्या, असे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले होते. त्यामुळे उदयनराजेंचे समर्थक संतप्त झाले. उदयनराजे समर्थकांनी गुरूवारी सकाळी अचानक सातारा बंदची घोषणा केली. शहरातील दुकानदारांनी आपापली दुकाने तत्काळ बंद केली.
दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी घालण्यात आली होती. या दोन्ही गाढवांची पोवई नाक्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त तैनात केला.
बसस्थानक, राजवाडा, मोती चौक या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. बंदमुळे शाळांनाही सुटी देण्यात आली. सकाळपासून शहरातील एसटी आणि रिक्षा वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. शहरातून दुचाकी रॅलीद्वारे उदयनराजेंचे समर्थक बंदचे आवाहन करत होते.