तीन महिन्यांमध्ये वनपट्टे आदिवासींच्या नावे करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 06:32 AM2018-11-23T06:32:56+5:302018-11-23T06:33:51+5:30
वनपट्टे नावावर करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने हजारो शेतकरी-आदिवासी यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : वनपट्टे नावावर करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने हजारो शेतकरी-आदिवासी यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.
वनपट्टे नावावर करण्यासह विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लोकसंघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेक नेते घोषणा देतच विधान भवनात गेले.
राज्यात सुमारे २,३१,००० वनपट्ट्यांची प्रकरणे असून त्यापैकी फक्त १ लाख ३० प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित वनपट्टे तातडीने नावावर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावर तीन महिन्यांत प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्य सचिवांची समिती त्याचा आढावा घेईल, असेही ते म्हणाले.
वनपट्टे नावे नसल्यामुळे आदिवासींना दुष्काळी भरपाई मिळालेली नाही. त्यांनाही भरपाई मिळावी ही मागणी तत्त्वत: मान्य करत पात्र शेतकºयांना लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
खावटी कर्ज माफ करतानाच भविष्यात ही रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची मागणीही मान्य झाली. पेसा कायद्याबाबत एक महिन्यात आढावा घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. बैठक सकारात्मक झाली तरी सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे प्रतिभा शिंदे म्हणाल्या. त्यामुळे शिष्टमंडळ मुख्य सचिवांकडे गेले. तिथे संध्याकाळी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ आझाद मैदानाकडे रवाना झाले.
...तर पुन्हा धडक देणार
लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे म्हणाल्या, मोर्चातील शेकडो शेतकरी आजारी पडले. पायाला फोड व अंगात ताप असताना त्यांनी मुंबई गाठली. सरकारवर विश्वास नसला, तरी मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनामुळे आम्ही मुंबई सोडण्याचे ठरवले आहे. लेखी आश्वासन पाळले नाही, तर तीन महिन्यांनी थेट मंत्रालयावर आदिवासी शेतकरी धडक देतील.