राज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 03:53 AM2018-09-02T03:53:26+5:302018-09-02T03:53:46+5:30
राज्यातील चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लवकरच राज्यात चर्मकार आयोग स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
मुंबई : राज्यातील चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लवकरच राज्यात चर्मकार आयोग स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
रोहिदास समाज पंचायत समाज संघाच्या वतीने परळ येथे उभारण्यात येणाऱ्या संत रोहिदास भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, आ. भाई गिरकर, आ. अजय चौधरी, मंगेश कुडाळकर, माजी महापौर महादेव देवळे, स्नेहल आंबेकर आदी
उपस्थित होते.
राज्य सरकारने या भवनासाठी ११ कोटी रुपये दिले असले, तरी त्यानंतरही काही कमी पडल्यास सरकार मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले, चर्मकार समाजाच्या अडचणी या आयोगाच्या माध्यमातून सोडविल्या जातील. संत रोहिदास यांचा समताधिष्ठित राज्याचा विचार होता. त्याच विचारावर सरकार चालत आहे.
मंत्री राजकुमार बडोले यांनी परळ येथे उभे राहत असलेल्या या भवनात, वसतिगृह, वाचनालय, आदी अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्यातील प्रत्येक विभागात अशाच प्रकारे संत रोहिदास भवन उभे करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.