‘फर्ग्युसन’च्या घोषणा देशविरोधी नव्हत्या
By Admin | Published: March 26, 2016 01:47 AM2016-03-26T01:47:47+5:302016-03-26T01:47:47+5:30
अभाविप आणि आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान दिल्या गेलेल्या घोषणा देशविरोधी अथवा देशविघातक नव्हत्या, असा निर्वाळा पोलिसांनी दिला असून
पुणे : अभाविप आणि आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान दिल्या गेलेल्या घोषणा देशविरोधी अथवा देशविघातक नव्हत्या, असा निर्वाळा पोलिसांनी दिला असून, गृहविभागाला याबाबतचा पाठवला आहे. घोषणा देशविरोधक होत्या की नव्हत्या याविषयावरुन गदारोळ उठलेला असतानाच पोलिसांनी हा अहवाल दिल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात मंगळवारी अभाविपच्या जेएनयू शाखेचा अध्यक्ष आलोक सिंग याचे व्याख्यान आयोजित केले होते. हा कार्यक्रम विनापरवाना होता. त्यानंतर आंबेडकरी आणि डाव्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांची हमरीतुमरी झाली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी डेक्कन पोलिसांना देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचे पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतल्यानंतर प्राचार्यांनी घुमजाव करीत प्रिंटींग मिस्टेक असल्याचे सांगून हे पत्रच मागे घेतले होते.
दोन दिवस चाललेल्या या गोंधळामध्ये देशविरोधात घोषणाबाजी झाली किंवा नाही, याबाबतचा तसेच एकूणच प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी गृहविभागाला पाठवला आहे. ज्या घोषणा पोलिसांसमोर आल्या आहेत, त्यामध्ये एकही घोषणा देशविरोधात असल्याचे निदर्शनास आलेले नाही. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी कोणाच्याही भावना दुखावतील अशा आणि देशविघातक घोषणा दिल्याचे आढळून आले नसल्याचे उपायुक्त तुषार दोषी यांनी सांगितले.
प्राचार्य रवींद्रसिंह परदेशींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ, मैत्री सोशल फाऊंडेशन, दलित युवक आंदोलन, रिपब्लिकन संघर्ष दल, तथागत प्रेरणा ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे. प्राचार्यांची भूमिका संशयास्पद असून, सांस्कृतिक पुण्यातील वातावरण गढूळ झाले असून बरेच प्रश्न अनुत्तरीत असल्याचे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)