‘आरोग्य विज्ञान’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By Admin | Published: June 22, 2017 05:09 AM2017-06-22T05:09:50+5:302017-06-22T05:09:50+5:30
एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ही प्रक्रिया दि. २८ जूनपासून सुरू होणार आहे. ‘नीट’चा निकाल दि. २६ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून आरोग्य विज्ञानच्या सर्व शासकीय, अनुदानित व खासगी विनानुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे ‘नीट’ या अखिल भारतीय स्तरावरील परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. त्यामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएसस्सी (नर्सिंग), बीएएसएलपी आणि बीपी अॅन्ड ओ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. नीट परीक्षेचा निकाल दि. ८ जून रोजी अपेक्षित होता. पण मद्रास उच्च न्यायालयाने निकालाला स्थगिती दिल्याने लांबणीवर पडला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात निकालावरील स्थगिती उठविल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. त्यानुसार दि. २६ जून रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकुण प्रवेश क्षमतेपैकी ८५ टक्के जागा राज्य कोट्यातून तर १५ टक्के जागा अखिल भारतीय कोट्यातून भरल्या जाणार आहेत. प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती वैद्यकीय शिक्षण संचालनालय व प्रवेश कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.