राज्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:25 AM2017-09-28T01:25:07+5:302017-09-28T01:25:27+5:30
महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरणाची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी केली. नवीन धोरणानुसार कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरणाची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी केली. नवीन धोरणानुसार कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या योजना या कृषी पर्यटन केंद्रांना मंजूर करण्यात येतील. कृषी पर्यटन केंद्र उपक्रमासाठी शेतजमिनीचा उपयोग किंवा वापर करण्यासाठी अकृषक वापर परवानगी घेण्याची गरज नसेल. कृषी पर्यटन केंद्रांना वीज, पाणी इत्यादी सुविधा शेतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात येतील, असे रावल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठी बँकांकडून अल्प व्याजदराने कर्ज मिळेल.
मंत्रालयात आकर्षक प्रदर्शन
महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांची माहिती दर्शविणारे प्रदर्शन मंत्रालयात भरविण्यात आले आहे. जयकुमार रावल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदी उपस्थित होते.
मुंबई-मालदिव क्रूझ २४ नोव्हेंबर रोजी
पर्यटन विभाग २४ नोव्हेंबरपाूसन कोचीन - मालदिव दरम्यान पहिले कोस्टा प्रवासी क्रुझ करणार आहे. या क्रुझमधील अनुभव लक्षात घेऊन नंतर श्रीलंका किंवा इतर ठिकाणीही क्रुझसेवा सुरू करण्यात येईल. कार्निव्हल ही क्रुझ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनीही भारतात क्रुझ सेवा सुरू करीत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
विराटवर संग्रहालय
राज्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ई - व्हेईकल झोन सुरू केला जाणार आहे. आयएनएस विराटवर नौदलाचे संग्रहालय स्थापन करण्यात येत आहे. या संग्रहालयाच्या निर्मितीनंतर ते वसई-विरार भागात स्थापित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे.
हेरिटेज इमारतींची माहिती एका क्लिकवर
मुंबईत ऐतिहासिक इमारतींचा खजिना आहे. देशविदेशातील पर्यटकांना त्यांची माहिती क्यू आर कोडच्या सहाय्याने एका क्लिकवर फोटोसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हर्निमन सर्कलपर्यंत प्राचिन वारसा लाभलेल्या अनेक इमारती आहेत. या इमारतींशी व मुंबईतील या ऐतिहासिक सौंदर्याशी सर्व परिचित व्हावे यासाठी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन विभाग व पर्यटन विकास महामंडळामार्फत बुधवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.