वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By Admin | Published: June 11, 2016 12:50 AM2016-06-11T00:50:51+5:302016-06-11T00:50:51+5:30
राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत शुक्रवारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली
पुणे : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत शुक्रवारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार दि. १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सीईटी कक्षामार्फत घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता; मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. खेळाडू विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. कक्षाकडे आलेल्या कागदपत्रांनुसार संबंधित विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देऊन शुक्रवारी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना सीईटीतील गुण व गुणवत्ता यादीतील क्रमांक असलेली गुणपत्रिका मिळण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. या यादीतील क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विभागीय केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे.
ही प्रक्रिया दि. १४ जून ते २ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रवेशाबाबतची माहितीपुस्तिका शनिवारपासून उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रांसह विभागीय केंद्रांवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. याठिकाणी दिलेल्या वेळेत समुपदेशन व पसंती अर्ज भरून घेतले जातील. त्यानंतर प्रवेशाची निवड यादी जाहीर केले जाईल. आवश्यक कागदपत्रे नसल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
>पसंती क्रम अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे
अधिकृत ओळखपत्र (शाळा-महाविद्यालय ओळखपत्र, आधार कार्ड, दहावी किंवा तत्सम परीक्षेचे प्रवेशपत्र यांपैकी कोणतेही एक).
आॅनलाइन डाऊनलोड केलेला प्रवेश अर्ज, एमएटी-सीईटी २०१६ चे प्रवेशपत्र.
दि. १० जूननंतर डाऊनलोड केलेले सीईटीचे गुणपत्रक, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, बारावीची गुणपत्रिका, दहावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र (जन्म तारखेसाठी), दहावीची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (आरक्षणासाठी), इतर कोट्यातील आरक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्र.
>विभागीय केंद्र
मुंबई - ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, सर जे. जे. हॉस्पिटल कॅम्पस, भायखळा, पुणे - बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून हॉस्पिटल कॅम्पस, औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घाटी हॉस्पिटल कॅम्पस, नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हनुमान नगर.