देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक जबाबदारी; विधान परिषदेत उपसभापतींनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 02:03 PM2022-08-17T14:03:20+5:302022-08-17T14:03:43+5:30
या पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी शिफारस केली होती.
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात आंदोलन करत होते. त्यानंतर विधानसभा, विधान परिषदेच्या कामकाजाला सकाळी ११ च्या सुमारास सुरुवात झाली. दोन्ही सभागृहात राष्ट्रगीताने कामकाजाची सुरुवात झाली.
विधानसभेसह विधान परिषदेतही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर विधान परिषदेतील सभागृह नेतेपद रिक्त होते. या पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी शिफारस केली होती. त्यानंतर सभागृहाच्या संमतीनंतर उपसभापतींनी देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली.
विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त सदस्यांची ओळख देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिली. यात रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रविण दरेकर, सचिन अहिर, प्रा. राम शिंदे, भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, अमशा पाडवी, श्रीकांत भारतीय यांचा समावेश होता.
विधिमंडळ नेत्यानंतर सभागृह नेता महत्त्वाचं पद असते. विधानसभेत मुख्यमंत्री सभागृहाचे नेते असतात तर विधान परिषदेत सरकारची आक्रमक बाजू मांडण्यासाठी अभ्यासू चेहऱ्याला संधी दिली जाते. मागील सरकारच्या काळात सभागृह नेतेपदी सुरुवातीच्या काळात सुभाष देसाई आणि त्यानंतर अजित पवारांना जबाबदारी दिली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले. त्यामुळे विधान परिषदेतील सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे.
विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गट आमनेसामने
विधान परिषदेत संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. अंबादास दानवे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ १२ इतके आहे. दानवे यांच्या निवडीमुळे विधान परिषदेत शिंदे-ठाकरे गट आमनेसामने आल्याचं चित्र आहे. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसनेही दावा केला होता. महाविकास आघाडीत आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसनं शिवसेनेवर लावला होता.