मोदींच्या पुणे दौऱ्यात ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेची घोषणा
By admin | Published: June 22, 2016 04:16 AM2016-06-22T04:16:04+5:302016-06-22T04:16:04+5:30
स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जूनला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या देशव्यापी स्पर्धेची घोषणा करणार आहेत.
पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जूनला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या देशव्यापी स्पर्धेची घोषणा करणार आहेत. त्याचबरोबर देशातील ९८ स्मार्ट सिटींच्या प्रोजेक्टची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांच्या होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
मोदी यांचे २५ जून रोजी दुपारी साडे तीन वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल. तेथून ४ वाजता ते बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचतील. तिथे लावण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रदर्शनातील स्टॉलला ते भेट देतील. ‘मेक युवर सिटी क्लीन’ या महत्वाकांक्षी स्पर्धेची घोषणा मोदी यावेळी करतील. यामध्ये एखादा रस्ता किंवा एखादा एरिया कशा पद्धतीने विकसित करता येईल, याचे प्रस्ताव सादर करता येणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व तज्ज्ञ अशा दोन पातळ्यांवर ही स्पर्धा घेतली जाणार आहे. देशभरातील स्मार्ट सिटीच्या प्रस्तावांची एकत्रित माहिती असलेल्या संकेतस्थळाचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. त्याचबरोबर दोन ते तीन स्मार्ट सिटीच्या महापालिकेतील अधिकारी , पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मोदी संवाद साधतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या भाषणानंतर मोदी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. (प्रतिनिधी)