गोव्यात आपच्या उमेदवारांची घोषणा येत्या महिन्यात

By admin | Published: August 23, 2016 09:32 PM2016-08-23T21:32:07+5:302016-08-23T21:32:07+5:30

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा येत्या काही आठवडय़ांत केली जाईल

The announcement of your candidates in Goa in the coming months | गोव्यात आपच्या उमेदवारांची घोषणा येत्या महिन्यात

गोव्यात आपच्या उमेदवारांची घोषणा येत्या महिन्यात

Next

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २३  : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा येत्या काही आठवडय़ांत केली जाईल, असे आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. येत्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल व सर्व चाळीसही उमेदवारांची नावे ऑक्टोबर अखेरीस जाहीर केली जातील, असे गुप्ता यांनी सांगितले.

आप उमेदवार निवडीची प्रक्रिया आता सुरू करत आहे. या प्रक्रियेत आपचे कार्यकर्ते व वॉलंटिअर्स यांना महत्त्वाचे स्थान असेल. प्रत्येक मतदारसंघात आपच्या सक्रिय वॉलंटिअर्सची बैठक होईल व त्यांच्याकडून संबंधित मतदारसंघासाठी उमेदवाराचे नाव पक्षाला सूचविले जाईल. कुठलाही एक वॉलंटिअर किंवा एकापेक्षा जास्त वॉलंटिअर्स उमेदवाराच्या नावाची शिफारस करू शकेल. पक्षाने ठरवून दिलेल्या निरीक्षकाच्या देखरेखीखाली वॉलंटिअर्सची बैठक होईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

ज्या व्यक्तींची नावे उमेदवार म्हणून वॉलंटिअरनी सूचविली आहेत, त्यांना अर्ज भरण्यासाठी पक्षाकडून निमंत्रित केले जाईल. हे अर्ज मग पक्षाच्या छाननी समितीकडे जातील. छाननी समिती येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल. प्रत्येक मतदारसंघासाठी छाननी समिती तीन ते पाच नावे शॉर्ट लिस्ट करील, असे गुप्ता यांनी सांगितले. ही नावे मग पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या समितीकडे पाठवली जाईल. त्या समितीवर गोव्यातील आपचे दोघे सदस्य असतील. ती समिती शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांच्या यादीतून अंतिम उमेदवार जाहीर करील, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. ही सगळी प्रक्रिया या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

गुन्हेगारी पाश्र्वभूमी किंवा खराब प्रतिमा असलेल्या व्यक्तीला आपकडून तिकीट दिले जाणार नाही. उमेदवार निवडीची प्रक्रिया पारदर्शक असेल. त्यामुळे कुणी पैसे घेऊन आपण तिकीट देतो, असे सांगितले तर तशा व्यक्तीच्या नादी लागून कुणीच स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन आपने केले आहे.
 

Web Title: The announcement of your candidates in Goa in the coming months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.