पंधरा दिवसांत दुष्काळ जाहीर करणार - दानवे
By admin | Published: September 10, 2015 02:46 AM2015-09-10T02:46:51+5:302015-09-10T02:46:51+5:30
राज्यातील पिकांच्या अंतिम आणेवारी अहवालाची वाट न पाहता शासन येत्या १५ दिवसांत दुष्काळ जाहीर करेन, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे
कोल्हापूर : राज्यातील पिकांच्या अंतिम आणेवारी अहवालाची वाट न पाहता शासन येत्या १५ दिवसांत दुष्काळ जाहीर करेन, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी येथे दिली. दुष्काळासंबंधीच्या तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रसंगी शासन कर्ज काढेल; पण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील; त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. दानवे म्हणाले, की दुष्काळाशी सामना करण्यासाठी शासन सज्ज झाले आहे. केंद्राकडून निधीची मागणी केली आहे. निधी मिळेपर्यंत राज्य शासन पैसे खर्च करणार आहे.
राज्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू आणि आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू केले आहेत. बँकांना शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने कर्ज देण्याची सूचना केली आहे. ज्या बँका या सूचनेचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
राष्ट्रवादीवाल्यांनी दूध संस्था
आणि बँका संपविल्या...
‘शेतकऱ्यांचे कैवारी’ म्हणून मिरवत आमच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्या राष्ट्रवादीने बळीराजांच्या दूध संस्था, सहकारी बँका संपविल्या. स्वत:च विकत घेतल्या. बारामतीमध्ये ते शेतकऱ्यांकडून १९ रुपये लिटरने दूध विकत घेतात आणि मुंबईत तेच दूध ७५ रुपये लिटरने विकतात. त्यातून मिळविलेले पैसे उत्पादकांना का देत नाहीत, अशी बोचरी टीका दानवे यांनी केली.
स्थलांतर नव्हे, सोयीसाठी... सर्व जिल्ह्यांत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्याचे आदेश देत त्याचे नियोजनही केले आहे. ‘मागेल त्यास काम’ मिळणार आहे. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज नाही. जी कुटुंबे स्थलांतरित होत आहेत; त्यांना शहरात चांगले पैसे मिळत असतील. ते सोयीसाठी स्थलांतरित होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.