'MHT-CET'चा निकाल जाहीर, विद्यार्थांना दोन गुणांचा बोनस
By admin | Published: June 1, 2016 02:06 AM2016-06-01T02:06:08+5:302016-06-01T02:10:23+5:30
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने केवळ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेत कुठल्या विभागात किती निकाल लागला, याची घोषणा मात्र झालेली नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ : वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच औषधशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य सामायिक परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. या परीक्षेत टॉपर कोण, हे मात्र जाहीर करण्यात आले नाही. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) केवळ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेत कुठल्या विभागात किती निकाल लागला, याची घोषणा मात्र झालेली नाही. विदर्भातून ५८ हजार ३७० परीक्षार्थींपैकी १२ हजार २०३, मराठवाड्यातून ५५ हजार ३४ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ८९४ तर उर्वरित महाराष्ट्रातून १ लाख ६२ हजार २२३ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ७०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. टक्केवारीनुसार हे प्रमाण विदर्भात २०.९१ टक्के, मराठवाड्यात २१.६१ टक्के तर उर्वरित महाराष्ट्र १३.९९ टक्के इतके आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सविस्तर निकाल आज बुधवारी सकाळी १० वाजता डीएमईआरच्या वेबसाईटवर टाकण्यात येतील. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी बुधवारीच सोपविली जाईल. अभियांत्रिकीची मेरिट यादी २०० तर मेडिकलची मेरिट यादी १९७ गुणांपासून सुरू होण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली. टॉपर कोणत्या शहरातील आहेत, हे देखील कळू शकले नाही. यंदा मेडिकल शाखेत विदर्भातील विद्यार्थ्यांची स्थिती सुधारेल, असे भाकितही वर्तविण्यात आले आहे.
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी १०५४ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेला राज्यभरात एकूण ४ लाख ९ हजार २७५ विद्यार्थी बसले होते. विदर्भात एकूण ५८ हजार ३७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी १२ हजार २०३ विद्यार्थी पात्र ठरले. म्हणजे विदर्भाचा निकाल २०. ९१ टक्के लागला. नागपूर विभागातील १२९ केंद्रांवर ४८ हजार ६०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २५ हजार ७०० विद्यार्थी नागपूर शहरातील होते. ८,१७० विद्यार्थ्यांनी मेडिकल व फार्मसी, ९,८३५ विद्यार्थ्यांनी केवळ अभियांत्रिकी तसेच ७,७६२ विद्यार्थ्यांनी मेडिकल व अभियांत्रिकी अशा दुहेरी प्रवेशासाठी परीक्षा दिली.
महाराष्ट्र शासनाकडून ५ मे २०१६ रोजी राज्यातील १,०५४ केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेचे गुण परीक्षार्थींना
www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. याविषयीची अधिसूचना संकेतस्थळावर तसेच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्राच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालक, मुंबई यांच्याकडून, तर पशुवैद्यकशास्त्र व मत्स्यविज्ञान या शाखांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र पशुवैद्यक व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून प्रक्रिया राबविली जाणार आहे
दोन गुणांचा बोनस!
५ मे रोजी झालेल्या सीईटीच्या परीक्षेत दोन प्रश्न चुकीचे आले होते. सुरुवातीला हे दोन्ही प्रश्न वगळण्याचा निर्णय झाला होता. पण सीईटी सेलने नंतर दोन्ही प्रश्न पत्रिकेत कायम ठेवल्याने विद्यार्थ्यांना दोन्ही चुकीच्या प्रश्नांचे दोन बोनस गुण देण्यात आले.