एसटीकडून वार्षिक सवलत कार्ड योजना बंद
By admin | Published: April 24, 2017 03:32 AM2017-04-24T03:32:06+5:302017-04-24T03:32:06+5:30
एसटी महामंडळाला तोट्याला सामोरे जावे लागत असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी असलेल्या योजना बंद केल्या जात आहेत.
मुंबई : एसटी महामंडळाला तोट्याला सामोरे जावे लागत असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी असलेल्या योजना बंद केल्या जात आहेत. एसटीकडून प्रवाशांच्या सोईसाठी १३ वर्षांपूर्वी वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात १0 टक्के सवलत मिळत होती. मात्र, ही योजना २२ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे वर्षाला २ ते ३ कोटींचा महसूल बुडणार आहे.
एसटी महामंडळाचे प्रवासी भारमान हे ५४ टक्के आहे. महामंडळाकडून भारमान वाढवण्याचे प्रयत्न केले जात असून, नवीन बसेस व योजना आणल्या जात आहेत. तरीही प्रवासी काही केल्या वाढत नसून, महामंडळाला तोटाही होत आहे. सध्या महामंडळाचा वार्षिक संचित तोटा १,८00 कोटी रुपयांवर आहे. अशी परिस्थिती असतानाही, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी योजनाच बंद करण्याकडे एसटीचा कल असल्याचे दिसते. प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने २00३ सालापासून वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक वर्ष कालावधीकरिता २00 रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला प्रवासी तिकिटात १0 टक्के सवलत देण्यात येत होती. १८ किलोमीटर पुढील प्रवासासाठी ही सवलत लागू होती. त्यामुळे या सेवेचा प्रवाशांंना चांगलाच फायदा होत होता, तर एसटीच्या तिजोरीत वर्षाला २ ते ३ कोटी रुपयांची भर पडत होती. ही भर पडत असतानाही एसटी महामंडळाने २२ एप्रिलपासून वार्षिक सवलत कार्ड योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.
या योजनेत प्रवाशाला १0 टक्के सवलत दिली जात असल्याने, एसटीला नुकसान सोसावे लागत होते, हे कारण पुढे करत ही योजना बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यामुळे प्रवासी संख्या कमी होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)