निनावी पत्रामुळे मृत्यूचे गूढ उकलले
By admin | Published: December 17, 2015 01:50 AM2015-12-17T01:50:17+5:302015-12-17T01:50:17+5:30
तालुक्यातील कळवंडे गावी जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार पार पडले, परंतु एका अज्ञात
चिपळूण : तालुक्यातील कळवंडे गावी जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी बैठक घेऊन त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार पार पडले, परंतु एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना पाठविलेल्या पत्रामुळे या खुनाला वाचा फुटली आणि यातील सातही आरोपी गजाआड झाले.
सुनील (३०) व मिलिंद बाळाराम जावळे या दोन भावांसह संदेश विष्णू शिगवण, प्रकाश तुकाराम शिगवण, गंगाराम सीताराम नाचरे, विजय पांडुरंग नाचरे, मंगेश तुकाराम नाचरे, विशाल उर्फ नानू विठ्ठल कदम हे २८ नोव्हेंबरला कळवंडे जंगलात शिकारीला गेले होते. शिकार करण्यासाठी झाडलेली बंदुकीची गोळी सुनील जावळेला लागली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कामथे जावळेवाडी येथे आणून वाड्यात ठेवण्यात आला. सुनीलच्या पत्नीलादेखील मृतदेह दाखविण्यात आला नाही. लगेच वाडीत बैठक घेऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला व २९ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता सुनीलवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदूक लपविली, तसेच रक्ताने माखलेल्या कपड्यांसह सर्वच पुरावे नष्ट करण्यात आले.
पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना ३ डिसेंबर रोजी कामथे गावातून एक निनावी पत्र आले. त्यात हा सर्व तपशील नमूद करण्यात आला होता. त्या पत्राशिवाय कोणताही पुरावा हाती नव्हता. शिवाय ग्रामस्थ खरी माहिती देणे शक्य नव्हते. सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अतिशय गुप्त रीतीने याचा तपास केला आणि सोमवारी रात्री सर्व सातही आरोपींना ताब्यात घेतले. मंगळवारी दिवसभर या आरोपींची चौकशी सुरू होती. या सात जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच भारतीय हत्यार कायदा लागू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)