‘मेट्रो’साठी आणखी १५ भूखंडांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:04 AM2017-07-18T03:04:50+5:302017-07-18T03:04:50+5:30

मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळल्यानंतर मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने महापालिकेकडे नव्याने १५ भूखंडांची

Another 15 plots demand for 'Metro' | ‘मेट्रो’साठी आणखी १५ भूखंडांची मागणी

‘मेट्रो’साठी आणखी १५ भूखंडांची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळल्यानंतर मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने महापालिकेकडे नव्याने १५ भूखंडांची मागणी केली आहे. यामध्ये विधान भवनाजवळील एक चौक, पालिकेच्या वसाहती, शाळा व खासगी मैदानाचीही जागा मागण्यात आली आहे. परंतु शिवसेनेने या प्रस्तावालाही विरोध दाखवून भाजपाला दणका देण्याचे मनसुबे आखले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपात पुन्हा जुंपण्याची चिन्हे आहेत.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन प्रकल्पांतर्गत हुतात्मा चौकसाठी रेल्वे कॉर्पोरेशनने पालिकेकडे काही मोकळ्या जागा मागितल्या होत्या. मात्र या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध असल्याने काँग्रेसच्या मदतीने
हा प्रस्ताव महासभेत फेटाळण्यात आला. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिकार वापरून हे भूखंड मेट्रोसाठी
हस्तांतरित केले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यात आता
मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नव्या प्रस्तावाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
पालिकेच्या मालकीचे भूखंड रेल्वे कॉर्पोरेशनला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मांडण्यात आला आहे.
मात्र मोकळ्या भूखंडाबाबत तडजोड नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेने या प्रस्तावालाही कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना - भाजपात वादळी चर्चा होण्याची चिन्हे
आहेत.

हे आहेत मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मागणी केलेले भूखंड...
कायमस्वरूपी -
जे. टाटा रोड चर्चगेट ५३ चौरस मीटर, वरळी पालिका चाळ ६८ चौरस मीटर, शिवकिरण सोसायटी २०० चौरस मीटर

तात्पुरते -
महर्षी वाल्मीकी चौक १२०३ चौरस मीटर, महापालिका क्रीडा संकुल आझाद मैदान २५४ चौरस मीटर, पालिका इमारत गिरगाव १५० चौरस मीटर, सिद्धिविनायक मंदिरामागची उद्यान विभागाची जागा ६७५४ चौरस मीटर, देसाई मैदान माहीम २८६२, माहीम येथील मोकळा रस्ता ५२०० चौरस मीटर, शिवकिरण सोसायटी मोकळी जागा ११६ चौरस मीटर, किंग जॉर्ज पाचवा मेमोरीयल वरळी येथील चौक १७५६ चौरस मीटर, वरळी पालिका चाळ ६१६ चौरस मीटर, आगारकर चौक शाळा वरळी ८२ चौरस मीटर.

Web Title: Another 15 plots demand for 'Metro'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.