आणखी २ माजी सैनिकांचा शोध
By admin | Published: May 18, 2017 12:09 AM2017-05-18T00:09:08+5:302017-05-18T00:09:08+5:30
सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्याचा कर्मचारी धाकलू पाटील याच्यासह आणखी दोन माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या तीन संचालकांचा
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्याचा कर्मचारी धाकलू पाटील याच्यासह आणखी दोन माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या तीन संचालकांचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्यात या आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश केला होता. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीर सिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून, तपासादरम्यान नागालॅण्ड येथे कार्यरत आसाम रायफल रेजिमेंटचा जवान धाकलू पाटील याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. चौकशीसाठी धाकलू पाटीलला ताब्यात घेण्यास ‘आसाम रायफल’ने संमती दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या गावीही पोलिसांचे पथक जाऊन आले. त्याची रीतसर रजा केवळ १५ एप्रिलपर्यंतच होती. तेव्हापासून तो घरी किंवा नोकरीवरही नसल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१चे पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली. ‘आसाम रायफल’च्या नोकरीव्यतिरिक्त तो बेळगाव येथे सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणारी जय भवानी नावाची संस्थाही चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास जवळपास अंतिम टप्प्यात असून, काही आजी-माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या काही संचालकांसह २४ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तपासादरम्यान आणखी दोन माजी सैनिकांचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला असून, पोलीस यंत्रणा त्यांचाही शोध घेत आहे.
फरार घोषित करण्याची प्रक्रिया
धाकलू पाटीलच्या अटकेसाठी सर्व प्रयत्न केले; परंतु तो घरी किंवा नोकरीच्या ठिकाणीही हजर नसल्याने त्याला फरार घोषित करण्याची विनंती न्यायालयास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धाकलू पाटील हा मुख्य आरोपींपैकी एक असल्याने त्याचा जबाब महत्त्वाचा आहे. त्याचे आणखी किती साथीदार आहेत, सैन्याची प्रश्नपत्रिका फोडण्याचे उद्योग यापूर्वी आणखी किती वेळा झालेत, या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडूनच मिळू शकतील, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.