ट्रॉम्बे प्रकरणी आणखी ८ अटकेत
By admin | Published: March 21, 2017 02:39 AM2017-03-21T02:39:00+5:302017-03-21T06:42:35+5:30
फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे शनिवारी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्याप्रकरणी सोमवारी आणखी आठजणांना अटक
मुंबई : फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे शनिवारी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्याप्रकरणी सोमवारी आणखी आठ जणांना अटक करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. तर दगडफेकीत जखमी झालेल्या १५ पोलिसांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर ट्रॉम्बे परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. तर रविवारी पकडलेल्या १७ हल्लेखारांना २४ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून एकूण याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या २५ झाली आहे. त्यामध्ये एमआयएमचे नगरसेवक शहानवाज हुसेन यांचा समावेश आहे.
एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट ट्रॉम्बे परिसरातील एका विकृत तरुणाने फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यामुळे संतप्त जमावाने त्याच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांवर दगड आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला. त्यामध्ये १५ पोलीस जखमी झाले होते. यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांच्या तीन वाहनांचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी रविवारी पहाटे पोलिसांनी नगरसेवक हुसेन यांच्यासह१७ जणांना अटक केली होती. त्या सर्वांना न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या सीसीटिव्हीमध्ये आणखी आरोपींचे चेहरे कैद झाले होते. मात्र घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाल्याने पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू ठेवला होता. त्यानसार सोमवारी सकाळी पोलिसांनी आणखी ८ जणांना अटक केली असून या हल्यातील अटक आरोपींची संख्या २५ झाली असल्याचे परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप म्हणाले. (प्रतिनिधी)