आणखी ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 05:52 AM2019-01-04T05:52:58+5:302019-01-04T05:55:01+5:30
पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.
मुंबई : पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. याआधी सरकारने ५ हजार गावांत दुष्काळ जाहीर केला असून १४ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
राज्यातील दुष्काळी भागांमध्ये राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा गुरुवारी मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पाणी टंचाई असलेल्या आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. त्यामुळे ज्या मंडळामधील गावांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे व कमी पर्जन्यमान आहे, अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे.
या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळांतील शेतकºयांच्या कर्जाची पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दुष्काळ जाहीर झालेली मंडळे
धुळे जिल्हा : साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल, दुसाणे, साक्री, कासारे, दहीवेल मंडळांतील ११६ गावे.
अहमदनगर जिल्हा : अकोले तालुक्यातील अकोले, वीरगाव, समशेरपूर, कोतुळ, ब्राह्मणवाडा येथील ११६ गावे.
जळगाव जिल्हा : एरंडोल तालुक्यातील एरंडोल व रिंगणगावमधील ३६ गावे. तसेच धरणगाव तालुक्यातील धरणगाव, साळवा, पाळधी, पिंप्री, चांदसर येथील ५९ गावे.
परभणी जिल्हा : गंगाखेड व जिंतूर तालुक्यातील गंगाखेड, सांगवील बामणी या महसूल मंडळांतील ८० गावे.
जालना जिल्हा : मंठा तालुक्यातील मंठा व ढोकसाळ सर्कलमधील ५८ गावे.
उस्मानाबाद जिल्हा : उमरगा तालुक्यातील उमरगा, मुरुम, नारंगवाडी, मुळज, दाळिंब या मंडळांतील ९६ गावे.
सातारा जिल्हा : खटाव तालुक्यातील निमसोड, मायणी, पुसेगाव, बुध, खटाव, औंध, पुसळेवाडी, कातरखटाव या मंडळांमधील १११ गावे.
बुलढाणा जिल्हा : बुलढाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, जळगाव जामोद या तालुक्यांतील बुलढाणा, देऊळघाट, पाडळी, रायपूर, धाड, चिखली, उनद्री, आमडापूर, हातणी, मेरा, महेकर, हिवराश्रम, देऊळगाव मही, जळगाव, जामोद या मंडळांतील २४६ गावे.
असा मिळणार दिलासा
कर्ज वसुलीला स्थगिती
रोजगार हमी योजनेमध्ये
१०० दिवसांऐवजी
१५० दिवस मजुरी
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ
यापूर्वी घेतलेले परीक्षा शुल्क जानेवारी अखेपर्यंत परत करण्यास विद्यापीठांना सूचना