Aaditya Thackeray : ’महाराष्ट्रात येणारा आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेला,’ आदित्य ठाकरेंचा दावा; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 02:53 PM2022-09-13T14:53:25+5:302022-09-13T14:54:55+5:30
Aaditya Thackeray on Semiconductor Project : वेदांता फॉक्सकॉननं सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत तो प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, असा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत असल्याचा अनेकदा भाजपवर आरोप करण्यात आला होता. परंतु आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका ट्वीटनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. वेदांता-फॉक्सकॉननं आपला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. वेदांता रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचा दाखला देत त्यांनी हा दाव केलाय.
हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. “भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प भारतात सुरू होत असल्याचा आनंद आहे. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानं धक्का बसला आहे. यापूर्वी फोटो ट्वीट करत हा प्रकल्प महाराष्ट्रात आणल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा हेतू/वचनबद्धता हा प्रकल्प महाराष्ट्रापासून दूर नेण्याची होती हे दिसते. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुभाष देसाई, एमआयडीसी यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत सर्व अंतिम टप्प्यात आलं होतं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Although I’m glad to see this in India, I am a bit shocked to see this.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2022
New dispensation had tweeted photos, claiming to have brought this to Maharashtra, but it seems intent/ commitment was to send this away from Maharashtra.
Our MVA Govt had brought this to final stage. (1/n) pic.twitter.com/ePbevT6tLi
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉनच्या या प्रकल्पाला शुभेच्छाही दिल्या. तसंच विकासाचा नवा मार्ग निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याला देशाच्या विकासात मोठं योगदान देणारं राज्य करण्याचे प्रयत्न केल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये गुजरात सरकार आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचेही आभार मानले.