मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:53 IST2024-12-07T13:51:05+5:302024-12-07T13:53:35+5:30
संख्याबळ कमी असलेल्या महाविकास आघाडीतील आणखी दोन आमदार कमी होणार आहेत.

मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ!
Mahavikas Aghadi ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात मविआ आमदारांचे अर्धशतकही पूर्ण शकली नाही. अशातच विरोधकांच्या या आघाडीला आणखी एक धक्का बसला असून समाजवादी पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज याबाबतची घोषणा केली असून लवकरच आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबतही चर्चा करू, अशी माहिती आझमी यांनी दिली आहे.
सत्ताधारी महायुतीवर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी शपथ घेण्याचं टाळलेलं असतानाच महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी मात्र शपथ घेतली. त्यानंतर आमदार अबू आझमी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
"...म्हणून मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय"
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या कारणाविषयी बोलताना अबू आझमी म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची सर्वधर्म समभावाची भूमिका असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद पाडल्याची आमची जखम ओली करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत," असं आझमी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाच्या एक्झिटमुळे आधीच संख्याबळ कमी असलेल्या महाविकास आघाडीतील आणखी दोन आमदार कमी होणार आहेत.