शिवसेनेला आणखी एक धक्का! दीपक केसरकर गुवाहाटीत, एकनाथ शिंदेंच्या गटात सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:59 AM2022-06-23T09:59:16+5:302022-06-23T10:00:03+5:30
Deepak Kesarkar : शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. कोकणातील शिवसेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यातत आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. कोकणातील शिवसेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. काल (22 जून) एकनाथ शिंदे यांच्या गटात गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे सामील झाले. मंत्री गुलाबराव पाटलांनंतर शिवसेनेला आज सकाळी आणखी एक धक्का बसला आहे. कोकणातील सेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
याचबरोबर, शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दादा भुसे, संजय राठोड आणि दिलीप लांडे यांच्याशी संपर्क झालेला नाही. मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधावारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे.