पोलिसांच्या छळाचे आणखी एक प्रकरण
By admin | Published: May 3, 2015 04:58 AM2015-05-03T04:58:37+5:302015-05-03T04:58:37+5:30
मॉडेल आणि तिच्या मित्राकडून पोलिसांनी कशा चलाखीने पैसे उकळले, यासंबंधीचे ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर अशा प्रकारे मॉडेल प्रकरणातील
डिप्पी वांकाणी, मुंबई
मॉडेल आणि तिच्या मित्राकडून पोलिसांनी कशा चलाखीने पैसे उकळले, यासंबंधीचे ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर अशा प्रकारे मॉडेल प्रकरणातील पोलिसांनी दमदाटी आणि मारहाण करून लुटल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. मॉडेल प्रकरणात पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी कारवाई केली. तथापि पत्रांतून आपबिती मारिया यांना कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप जयराम झागडे यांनी केला आहे.
जयराम झागडे यांचे असे म्हणणे आहे, की ३० डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी एपीआय सुरेश सूर्यवंशी आणि अन्य पाच जण माझ्या दुकानात आले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला की, एका इसमाने ७० ग्रॅम चोरीचे सोने तुम्हाला विकले. त्यावर मी म्हणालो की, ती व्यक्ती माझ्याच भागात राहत असल्याने मी त्या व्यक्तीला ओळखतो. त्याने फक्त ३८ ग्रॅम सोने मला विकले. त्याची खरेदी पावती देण्याची हमी त्याने दिली होती. सोने विकणाऱ्या व्यक्तीने अगदी कळवळून सांगितले की, माझी आई आजारी आहे. तिला इस्पितळात दाखल करण्याते आले असून, उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे. इस्पितळातून आईला सुटी मिळाल्यानंतर सोने खरेदीची पावती देईल. तो माझ्याच भागात राहत असल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्याकडून ३८ ग्रॅम सोने विकत घेतले. सूर्यवंशीने मला साकीनाका पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केली आणि ७० ग्रॅम सोने आणि ५० हजार रुपये मागितले. पैसे दिले नाही तर अंधेरीत घडलेल्या सोने चोरीच्या १८ प्रकरणांत गुन्हा दाखल करीन, अशी धमकीही दिली. मी जाम घाबरलो. सूर्यवंशीला ७० ग्रॅम सोने आणि पैसे देऊन मोकळा झालो. तथापि, हे प्रकरण येथेच थांबले नाही. ४ जानेवारीला सूर्यवंशीने मला बोलावून मी दिलेले सोने चांगल्या प्रतीचे नसल्याचे सांगत ७ ग्रॅम २४ कॅरेटच्या सोन्याची मागणी केली. आता काय करावं? मला काही सुचत नव्हतं. एकाने मला एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पत्र लिहून हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी ८ जानेवारी रोजी सूर्यवंशीविरुद्ध एसीपी, डीसीपी आणि पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. २० मे रोजी सूर्यवंशीने झागडे यांना अटक केली. पोलीस कोठडीत त्याने पुन्हा ७० ग्रॅम सोन्याची व्यवस्था करण्यास सांगितले. आता मला शक्य नाही, असे मी सांगितल्यानंतर सूर्यवंशी ६० आणि ४० ग्रॅमनंतर १० ग्रॅमवर आला. पोलीस कोठडीत असताना त्याने माझा मोबाइल आणि अन्य चीज वस्तूही काढून घेतल्या, असे झागडे यांनी सांगितले. या प्रकाराबाबत मी पुन्हा १३ मार्च रोजी आयुक्त राकेश मारिया यांना पत्र लिहिले. सूर्यवंशी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मॉडेलच्या मित्राकडून कसे पैसे उकळले, याचे वृत्त माझ्या वाचण्यात आल्यानंतर मलाही असे वाटले की, माझी आपबिती इतरांना सांगायला हवी. मारिया यांच्याशी संपर्क साधून माझ्या पत्रांची दखल का घेतली नाही, असे विचारले असता मारिया म्हणाले की, दररोज हजारो पत्रं येतात. माझ्या नावाने आलेले पत्रच माझ्याकडे येते, असे सांगून माझी बोळवण केली, असे झागडे यांनी सांगितले.