तिहेरी हत्याकांड प्रकरणी आणखी एक ताब्यात
By admin | Published: April 27, 2015 02:00 AM2015-04-27T02:00:56+5:302015-04-27T02:00:56+5:30
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मालदेव सेडाशी येथील सावंत कुटुंबीयांच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले आहे
खेड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मालदेव सेडाशी येथील सावंत कुटुंबीयांच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नातेवाइकांनी या तिघाही मृतांना ओळखले असून, सडलेल्या मृतदेहांचे नमुने तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत.
लीलाबाई बापू सावंत (वय ४२), मनीषा बापू सावंत (१७), पूनम बापू सावंत (१२) यांचा खून करून त्यांचे मृतदेह रघुवीर घाटातील माकडकडी या जंगलमय भागात टाकून दिल्याप्रकरणी अशोक धोंडिराम ढवळे (रा. शिरगाव पिंपळवाडी, ता़ खेड) आणि अविनाश शिंदे (रा. शिंदी, ता. महाबळेश्वर, जि़ सातारा) या दोघांना पेण पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. खेड तालुक्यातील आणखी एका संशयिताला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी नातेवाइकांनी तिन्ही मृतदेह ओळखले असून, या प्रकरणी आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सडलेल्या मृतदेहांचे नमुनेदेखील तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत.
मायलेकींचे सडलेले मृतदेह पेण पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्या मृतदेहांचे विच्छेदन तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यावर ते मृतदेह खेड नगर परिषदेच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत. या हत्याकांडाची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक खेडमध्ये दाखल झाले आहेत. या तिघीही बेपत्ता झाल्याची तक्रार दीपाली प्रशांत शिंदे (२३, रा. दिवा) यांनी पेण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर तपास करताना हे हत्याकांड उघड झाले. आरोपींनी तिघींना रघुवीर घाटात अज्ञातस्थळी ठेवून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
मृत लीलाबाई सावंत हिचा मोबाइल आरोपीकडे सापडल्यामुळेच आरोपीचा शोध लागल्याचा दावा पेण पोलिसांनी केला़ या तिहेरी हत्याकांडप्रकरणी आणखी कोणाचा समावेश आहे, याबाबतचा तपास पेण पोलीस करीत असतानाच पोलिसांनी खेड तालुक्यातून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)