भास्कर जाधवांविरोधात दुसरी तक्रार दाखल
By admin | Published: October 12, 2014 10:55 PM2014-10-12T22:55:25+5:302014-10-12T23:32:32+5:30
आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाल्याने जाधव यांच्या अडचणीत वाढ
गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी आचारसंहिता कालावधीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी घड्याळाचे चिन्ह असलेल्या पिशव्या, निकृष्ट दर्जाच्या साड्या तसेच टी-शर्टचे वाटप करुन आचारसहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी, चिपळूण यांच्याकडे काँग्रेस पााचे उमेदवार संदीप सावंत यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील यशवंत बाईत यांनी जाधव यांच्यावर खोटा प्रचार केल्याचा ठपका ठेवत जी कामे केली नाहीत, ती कामे केल्याचा देखावा प्रचारादरम्यान पत्रके वाटून केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्याबाबत जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर दोन दिवसांनीच आता दुसरी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाल्याने जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, भास्कर जाधव यांनी २०० कोटींची विकासकामे केली, असा गाजावाजा करुन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घड्याळाचे चिन्ह असलेल्या वस्तू त्यांनी मतदारांना वाटल्या आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करुन भास्कर जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, अशी मागणी संदीप सावंत यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी गुहागरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे. (प्रतिनिधी)