आणखी एका नगरसेविकेचे पद धोक्यात
By admin | Published: July 11, 2017 12:58 AM2017-07-11T00:58:27+5:302017-07-11T00:58:27+5:30
भारतीय जनता पक्षाच्या किरण जठार यांच्या नगरसेविका पदानंतर आता त्यांच्याच आणखी एका नगरसेविकेचे पद धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या किरण जठार यांच्या नगरसेविका पदानंतर आता त्यांच्याच आणखी एका नगरसेविकेचे पद धोक्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाच्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचे जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने सोमवारी अवैध ठरविले.
यापूर्वी जठार यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर धनकवडे यांचे पद याच कारणाने रद्द करण्याची कारवाई महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी
केली आहे.
दरम्यान, जठार यांच्यावर
कारवाई न करता, आयुक्तांनी राष्ट्रवादीच्या धनकवडे यांच्यावर
मात्र कारवाई केली. आता भाजपाच्या दुसऱ्या नगरसेविका अडचणीत आल्या आहेत.
त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्याची कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राजकीय दबावाखाली निर्णय घेतात, अशी टीका आधीच केली आहे.
इतर मागासवर्ग महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून शेख विजयी झाल्या होत्या. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांच्या भगवान जाधव व अर्चना कुचेकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर सदानंद पाटील, व्ही. आर. गायकवाड, व्ही. ए. पाटील यांच्या समितीपुढे सुनावणी झाली. त्यानंतर जात स्पष्ट होत नाही, या कारणावरून समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द ठरवले.