हृदयविकाराने आणखी एकाचा मृत्यू
By admin | Published: May 25, 2015 04:13 AM2015-05-25T04:13:41+5:302015-05-25T04:13:41+5:30
वाढत्या ताण तणावामुळे पोलिसांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. ताडदेव वाहतूक शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मुंबई : वाढत्या ताण तणावामुळे पोलिसांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. ताडदेव वाहतूक शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जालिंदर कृष्ण रमाणी (५७) यांचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गेल्या १० दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने तिसऱ्या पोलिसाचा बळी गेला.
मुलगा बाहेरगावी शिक्षणासाठी असल्याने रमाणी पत्नीसोबत भायखळा पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास होते. १९८६ साली ते पोलीस दलात रुजू झाले. गेल्या दीड महिन्यापासून ते ताडदेव वाहतूक पोलीस चौकीत वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी ते वरळी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
१५ दिवसांपूर्वी त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी पुन्हा छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शांत आणि मनमिळावू स्वभावाचा अधिकारी गमावल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. पुढच्या वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते. यापूर्वी १६ मे रोजी वरिष्ठ निरीक्षक सुधीर बेकणाळकर यांचे, तर १८ मे रोजी गोरेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत कुंभारे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. (प्रतिनिधी)