आजाराला कंटाळून आणखी एका डॉक्टरची आत्महत्या
By Admin | Published: April 22, 2017 12:02 PM2017-04-22T12:02:24+5:302017-04-22T12:02:24+5:30
धुळ्यातील शिंदखेडा येथील एका डॉक्टरनं आजार पणाच्या नैराश्यातून स्वतःचं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 22 - शिंदखेडा येथील एका डॉक्टरांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. श्याम उद्धव गिरासे (42) असे आत्महत्या करणा-या डॉक्टरचे नाव असून ते राजपूत गल्लीत राहत होते.
शनिवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वीच गिरासे यांना कॅन्सर झाल्येच निदान समोर आले होते. याच नैराश्यातून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोटासंबंधीच्या आजाराने त्रस्त असलेल्या भंडारा शहरातील एका प्रख्यात चर्मविकार तज्ज्ञाने आत्महत्या केली होती. विद्यानगर कॉलनीत घडलेली ही घटना 18 एप्रिल रोजी उघड झाली होती. यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्रितीश अरविंद भोयर (३०) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव. सोमवारला रात्री भोजन केल्यानंतर त्यांनी राहत्या घरी विष मिश्रित केलेले सलाईन स्वत:ला टोचून घेतले. मंगळवारी सकाळी प्रितीशचे वडील अरविंद भोयर यांनी त्यांना उठविण्यासाठी आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता डॉ.प्रितीश हे निपचित पडून असल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी वडिलांनी भंडारा पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांना त्यांच्या खोलीतून सलाईनची रिकामी बॉटल, काही वस्तू व आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. रात्रीला सलाईनमधून विष घेवून डॉ.प्रितीश यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ.प्रितीश यांना पोटाच्या आजारामुळे होणाऱ्या वेदना त्यांना असह्य झाल्यानं त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वडिलांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. एमबीबीएस, एमडी असे उच्च विद्याविभुषित असलेले डॉ.प्रितीश हे शहरात चर्मविकार तज्ज्ञ म्हणून प्रख्यात होते.