आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: May 5, 2017 02:24 AM2017-05-05T02:24:35+5:302017-05-05T02:24:35+5:30
सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्येने बारामती तालुका हादरला आहे. शिर्सुफळ येथील काशिनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येनंतर
बारामती / सुपे : सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्येने बारामती तालुका हादरला आहे. शिर्सुफळ येथील काशिनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी (दि. ३) मध्यरात्री खोपवाडी (ता. बारामती) येथील सुखदेव चंद्रकांत चांदगुडे (वय ३५, रा. खोपवाडी) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
त्याच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुखदेव यांचा शेतीव्यवसाय तसेच ट्रकचा व्यवसाय होता. बुधवारी (दि. ३) दुपारी चांदगुडे यांनी पत्नीला यात्रेच्यानिमित्ताने माहेरी सोडले होते. त्यामुळे घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यासंदर्भातील खबर नामदेव दादासोा चांदगुडे यांनी पोलिसांना दिली.
गुरुवारी सकाळी शेजारील नामदेव चांदगुडे यांनी घराच्या खिडकीतून पाहिल्यावर झालेला प्रकार समोर आला. चांदगुडे यांनी पोलिसांना त्वरित खबर दिली. सुखदेव चांदगुडे यांच्या वडिलांच्या नावावर शेतीचे पीककर्ज होते. तसेच ट्रकचाही कर्जाचा बोजा झाला होता. या कर्जाच्या नैराश्यातून सुखदेवने आत्महत्या केली असावी, असा अंदाज नातलगांनी व्यक्त केला आहे. येथील फौजदार के. बी. मोरे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व तहसीलदार हनुमंत पाटील यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील या प्रकाराची माहिती देऊन, योग्य त्या सूचना दिल्या. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीशवविच्छेदन केले.
बारामतीत शेतकरी आत्महत्येचे सत्र...?
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी नेहमीच्या दुष्काळाने अडचणीत आला आहे. शेतीच्या पाण्यासाठी अनेक वेळा येथील जनता रस्त्यावर उतारली आहे. मात्र शासनदरबारी त्यांची केवळ उपेक्षाच झाली आहे. सततच्या नापीकी आणि दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातदेखील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले नाही ना, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.