पुण्यात आणखी एक शासकीय रुग्णालय
By Admin | Published: June 29, 2016 12:58 AM2016-06-29T00:58:10+5:302016-06-29T00:58:10+5:30
बिबवेवाडी येथे ससून शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर आणखी एक शासकीय रुग्णालय होण्याची शक्यता आहे.
पुणे : बिबवेवाडी येथे ससून शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर आणखी एक शासकीय रुग्णालय होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी असणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या (ईएसआय) जागी हे रुग्णालय उभारण्यास कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात मुंबईत लवकरच बैठक घेऊन निर्णय करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.
ईएसआयसीतर्फे रुग्णालयाची उभारणी करून ते रुग्णालय महापालिका चालवेल किंवा ते राज्य शासनाकडे सुपूर्द करेल, असे धोरण शासनाने ठरविले असल्याची माहिती मेहता यांनी सोमवारी दिली. या रुग्णालयाचा लाभ कामगारांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही होणार आहे.
मेहता यांनी सोमवारी विमा रुग्णालयाला भेट दिली. या वेळी कामगार विमा निगमचे संचालक दीपक जोशी, वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. श्रीपाद भागवत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. सरोदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. ए. इंगळे, डॉ. एस. एस. सताळे, मोहननगर येथील प्रशासकीय अधिकारी डॉ. एम. आर. पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. पी. भगत, विभागीय अधिकारी एस. एम. झोंडे, नगरसेविका मानसी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
>नागरिकांना मिळतील चांगल्या सुविधा
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, की सुमारे १६.५ एकर जागेवर कामगार विमा रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बाह्यरुग्ण विभागात कोणत्याही सुविधा नसून तो कार्यान्वित नाही. स्वतंत्र विशेषज्ञांसह आंतररुग्ण विभाग (आयपीडी) व अन्य सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या ठिकाणी ससूनच्या धर्तीवर मोठे रुग्णालय उभारण्यासाठी मी सहा वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. कामगारमंत्र्यांनी या मागणीला तत्त्वत: मान्यता दिल्याने नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळू शकतील. त्यामुळे ससून शासकीय रुग्णालयावरचा ताणही कमी होईल.