दोन मंत्र्यांसमोर बोलू दिले नाही; शिंदेंना पाठिंबा देणारा आणखी एक अपक्ष आमदार नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 12:47 PM2024-01-04T12:47:26+5:302024-01-04T12:51:25+5:30
राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार नाराज
राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता तर ते मी युतीसोबतही नाही आणि आघाडीसोबतही नाही असे सांगत आहेत. ठाकरे सरकारमध्ये मिळालेले मंत्रिपद सोडून ते शिंदेंसोबत आले होते. तरीही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळालेले नाहीय. शिवसेनेमध्ये देखील अनेकजण इच्छुक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. अधुनमधुन त्यांची नाराजी समोर येत असते. असे असताना शिंदे सरकारला पाठिंबा देणारे आणखी एक आमदार नाराज झाले आहेत.
त्यांच्याच मतदारसंघातील शासकीय कार्य़क्रमात दोन मंत्री असताना बोलू न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरच्या कृषी महोत्सवात बोलू न दिल्याने मला यापुढे बोलवत जाऊ नका, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
जोरगेवार यांचे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव होते. मंचावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात या दोघांची भाषणे झाली परंतु जोरगेवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही यामुळे ते नाराज झाले आहेत. दोन्ही मंत्र्यांसमोर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
पुढील काळात भाषणाची संधी देणार असाल तरच निमंत्रण पत्रिकेवर नाव टाका, अन्यथा कार्यक्रमांना बोलवूही नका, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. राज्यातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदाराचा प्रशासन अशाप्रकारे अपमान करू शकत नाही, अशा शब्दांत जोरगेवार यांनी मंत्र्यांसमोरच खडसावले आहे.