ठाणे जिल्ह्यात दुसरे कृषी समृद्धी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:36 AM2017-07-18T00:36:12+5:302017-07-18T00:36:12+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास
- नारायण जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे. हे केंद्र कल्याण तालुक्यातील मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे, आंबिवली तर्फे वासुंद्री येथे उभारण्यात येणार आहे. याबाबत, स्थानिकांकडून नगरविकास विभागाने आता हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.
राज्यातील १० जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन संपादनास असणारा शेतकऱ्यांचा विरोध डावलून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातात हात घेऊन, नगरविकास विभागाने या मार्गावरील प्रस्तावित २४ समृद्धी केंदे्र अर्थात, टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील कासगाव, सापगाव, शेलवली, खुटघर, फुगळे, वाशाळा, हिव आणि रास या गावांतील जमिनीवर कृषी समृद्धी केंद्र अर्थात, नवी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी या महापालिकांसह नाशिक शहरापासून ही टाऊनशिप जवळ असल्याने, येथील जागांना सोन्याचे भाव आले आहेत.
या भागात टाऊनशिप येणार असल्याचे आधीच माहीत असल्याने, मंत्रालयातील अनेक सनदी अधिकाऱ्यांनी येथे नातेवाईकांच्या नावे जमिनी विकत घेऊन ठेवल्याचा आरोप करून, शहापूर तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
मात्र, त्यांचा विरोध डावलून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी, नागपूरपाठोपाठ ठाणे शहरातही शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदीखतावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर, लगेच आता कल्याण तालुक्यात आणखी एक कृषी समृद्धी केंद्र प्रस्तावित केले आहे.
प्रत्येकी ५०० हेक्टरची एक टाऊनशिप
या संपूर्ण मार्गावर एकूण २४ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दोन कृषी समृद्धी केंद्रांतील अंतर साधारणत: २० ते ४० किमी राहणार असून, प्रत्येकाचे क्षेत्र ४०० ते ५०० हेक्टर राहणार आहे. त्या ठिकाणी गरज आणि संभाव्य क्षमता लक्षात घेऊन, कृषिपूरक उद्योग, पर्यटन, शैक्षणिक सुविधा केंद्र, वैद्यकीय सुविधा निर्माण करून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय फूड मॉल, पेट्रोलपंप, मनोरंजन मॉल, शीतगृह, वखारींची साखळी आणि सर्वांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. यावर, टाऊनशिपमधील पायाभूत सुविधांवर रस्ते विकास महामंडळाने २४०० कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे.