पुण्यातील नाजूक प्रकरणामुळे ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री गोत्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:59 AM2021-02-11T02:59:18+5:302021-02-11T06:53:28+5:30
Another minister in the state likely in trouble due to girls suicide: चौकशीची मागणी; ‘पूजा’ची आत्महत्या की घातपात?
पुणे : हडपसर परिसरात रविवारी (दि. ७) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही नेमकी आत्महत्या होती की तिला कोणी मारलेे, याचा तपास करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने केली. या संदर्भातील तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. विदर्भातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षीय पूजा या तरुणीने इमारतीवरून उडी मारून पुण्यात आत्महत्या केली होती. तिचे मूळ गाव परळी (जि. बीड) आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली होती. तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही; परंतु संबंधित तरुणीच्या आत्महत्येवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्याबाबत अधिकृत कोणतीही तक्रार अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. संबंधित बड्या मंत्र्याचा या तरुणीसोबत असलेला संबंध पोलिसांनी शोधून काढला पाहिजे.
या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषी गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी करत भाजपा महिला आघाडीने तशी तक्रार दाखल केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबतचे निवेदनही दिले आहे. महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल
पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ज्या मंत्र्याचा संबंध जोडला जात आहे, त्याच्या काही कथित ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे.
कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत. या कथित ऑडिओ क्लिप बाहेर कशा आल्या याविषयी देखील उलटसुलट चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडचणीत येऊ, असे लक्षात आल्याने काही व्यक्तींनी मुद्दाम संवाद रेकॉर्ड करून ठेवले, असे म्हटले जाते.
पूजा चव्हाणच्या फेसबुक प्रोफाइलवर एका मंत्र्याचा फोटो होता. त्याअनुषंगानेही सर्वत्र चर्चा होत आहे. आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण इस्पितळात दाखल झालेली होती का? असेल तर ती नेमकी कशासाठी दाखल झाली होती याची चौकशी करण्याची मागणीदेखील होत आहे.