मंकी हिल ते कर्जतदरम्यान आणखी महिनाभर मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:28 AM2019-10-31T01:28:23+5:302019-10-31T06:16:44+5:30
दिवाळीच्या सुट्टीहून माघारी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मंकी हिल ते कर्जतदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावर तांत्रिक कामे केली जाणार आहेत. यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत कर्जत दिशेकडील रेल्वे मार्गावर ब्लॉक असेल. परिणामी, मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-विजापूर-मुंबई, पनवेल-नांदेड-पनवेल साप्ताहिक, पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर या एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.
मुंबई-पुणे घाटात एक्स्प्रेससाठी तीन मार्गिका उपलब्ध आहेत. लोणावळा घाटात मंकी हिल घाटात तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत होणे अपेक्षित आहे. २१ आॅक्टोबर रोजी याच मार्गावर १० दिवसांचा ब्लॉक घेतला होता. मात्र या कालावधीत रेल्वेची कामे पूर्ण न झाल्याने पुन्हा लोणावळा घाटात मंकी हिल ते कर्जतदरम्यान एक महिन्याचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
महिनाभर घेण्यात येणाºया या महाब्लॉकमुळे दिवाळीच्या सुट्टीत गावी किंवा बाहेरगावी गेलेल्या आणि आता सुट्टी संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी निघालेल्यांचे हाल होणार असल्याची नाराजी प्रवाशांमध्ये आहे.
२२ एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले
घेण्यात येणाºया मेगाब्लॉकमुळे २२ एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद-मुंबई हुसैनसागर एक्स्प्रेस, एलटीटी-विशाखापट्टनम-एलटीटी, एलटीटी-हुबली-एलटीटी, पनवेल-नांदेड-पनवेल या एक्स्प्रेस ३१ नोव्हेंबरपर्यंत पुण्यापर्यंत चालविण्यात येणार आहेत. यामुळे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.
भुसावळ-पुणे- भुसावळ एक्सप्रेस दौंड-मनमाडमार्गे धावणार
मंकी हिल ते कर्जत दरम्यान कर्जत दिशेकडील मार्गावर तांत्रिक कामासाठी २२ ऑक्टोबरपासून ते १ नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक घेतला होता.
मात्र या कालावधीत या मार्गावरील तांत्रिक बाबीची पूर्तता होणार नाही. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबरचा संपूर्ण महिना ब्लॉक घेण्यात येईल. दह दिवस घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे २२ ऑक्टोबरपासून या मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांचे हाल होत आहेत.
त्यातच आता ३० नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना नाराजी व्यक्त केली आहे. ब्लॉकदरम्यान, भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस ३१ आॅक्टोबरपर्यंत दौंड-मनमाड मार्गे धावणार आहे.