महिलांसाठी सरकार आणखी एक नवीन योजना आणणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:29 AM2024-10-08T00:29:13+5:302024-10-08T00:29:43+5:30

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला.

Another new scheme for women will be introduced informs Chandrakant Patil | महिलांसाठी सरकार आणखी एक नवीन योजना आणणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

महिलांसाठी सरकार आणखी एक नवीन योजना आणणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

BJP Chandrakant Patil ( Marathi News ) : "घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मुर्त रूप येणार आहे," अशी माहिती भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती इथं बोलताना दिली.

सायन्स स्कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, प्रविण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याला राजमाता मॉ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या‍ विचारांचा वारसा लाभला आहे. या महिलांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. महिलांचा विकास हा शासनाचा अग्रकम आहे. त्यासाठी शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांची माहिती महिलांना माहिती व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. याठिकाणी भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी.
 
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना बळ देणारी आहे. महिलांचे अर्ज पात्र झाल्यापासून त्यांना लाभ देण्यात येत आहे. ही योजना निरंतर सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात सहा लाखाहून अधिक लाभार्थी असलेली ही योजना आहे. थेट बॅंक खात्यात ही रक्कम देण्यात येत असल्यामुळे कमी वेळात ही योजना यशस्वी झाली आहे. यासोबत मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलिंडर, पिंक रिक्षा, बचतगटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन, तीर्थक्षेत्र आदी असंख्य योजना महिला सशक्तीकरण करण्यासाठी राबविण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजना यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांचे मानधन वाढविण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ताही लवकरच दिला जाईल. ग्रामपातळीवर लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांनी शासनाला सहकार्य करावे," असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.

Web Title: Another new scheme for women will be introduced informs Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.