आणखी एकजण ताब्यात
By admin | Published: December 6, 2014 02:10 AM2014-12-06T02:10:17+5:302014-12-06T02:10:17+5:30
जवखेडे हत्याकांडात आणखी एका आरोपीला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या संशयिताची कसून चौकशी सुरू
अहमदनगर : जवखेडे हत्याकांडात आणखी एका आरोपीला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या संशयिताची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हा दुसरा संशयित यापूर्वी अटकेत असलेल्या प्रशांत जाधवचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती आहे.
जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील फिर्यादी व मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत जाधव याला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली होती. त्याला पाथर्डी न्यायालयाने दहा दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रशांतकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडून हत्याकांडाचा सविस्तर उलगडा होण्याची शक्यता असून, मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलीस संशयितांना अटक करीत आहेत. शुक्रवारी दुपारी आणखी एका जवळच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दोनच दिवसांत हत्याकांडातील दुसऱ्या आरोपिला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे समजते.
दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके म्हणाले, तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी दुसऱ्या कोणालाही
अटक करण्यात आलेली नाही. चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, मात्र त्याला अटक केलेली नाही. (प्रतिनिधी)
> सीबीआय चौकशीची नामुष्की टळली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवखेडे खालसा येथे भेट देऊन निश्चित वेळेत तपास झाला नाही तर प्रकरण चौकशीला सीबीआयकडे सोपविले जाईल, असे संकेत दिले होते. तशी घोषणा हिवाळी अधिवेशनात केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी जलदगतीने काही फासे टाकले आणि त्यामध्ये आरोपी गळाला लागले. वेळेवर मिळालेला नार्को चाचणीचा अहवाल आरोपीपर्यंत पोहचविण्यात पोलिसांच्या मदतीला आला. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच हत्याकांडाचा उलगडा झाला आहे, असा दावा पोलिसांनी केला.