अकरावी आॅनलाईन प्रवेशाची विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर आणखी एक संधी ?
By admin | Published: July 14, 2016 08:28 PM2016-07-14T20:28:30+5:302016-07-14T20:28:30+5:30
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत चूकीचे अर्ज भरलेले, किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत चूकीचे अर्ज भरलेले, किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. आॅनलाईन प्रक्रियेत सामील न झालेल्या किंवा सामील झाल्यानंतर चुकीमुळे बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
उपसंचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश विद्यार्थ्यांनी चूूकीचा अर्ज भरल्याने किंवा, पसंतीक्रम अर्जात चूकी केल्याने त्यांना आॅनलाईन प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले.
याशिवाय अर्धवट माहितीमुळे काही विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतलेले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्रातील उरलेल्या रिक्त जागांवर प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची एक बैठकही पार पडली.
अकरावीची तिसरी यादी मंगळवारी जाहीर झाली असून अद्याप १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यासाठी १८ जुलैला अकरावीची चौथी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे २० जुलैपर्यंत चौथ्या यादीतील विद्यार्थी महाविद्यालयांत प्रवेश घेतील. त्यानंतरच अर्ज न भरलेले, चुकीचा अर्ज भरलेले, अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी यांच्यासाठी आॅनलाईन प्रवेश नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.