आणखी एका पोलिसावर हल्ला
By admin | Published: October 23, 2016 01:42 AM2016-10-23T01:42:51+5:302016-10-23T01:42:51+5:30
क्रॉफर्ड मार्केट परिसरात अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस शिपाई युवराज पाटील (३९) यांना एका कारचालकाने दमदाटी करत मारहाण केल्याची
मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरात अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस शिपाई युवराज पाटील (३९) यांना एका कारचालकाने दमदाटी करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मात्र गुन्हा दाखल करु नये म्हणून सपाच्या आमदाराकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. दबावाला न जुमानता एम.आर.ए. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
एम.आर.ए.मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई पाटील हे सहकाऱ्यांसोबत क्रॉफर्ड मार्केट परिसरातील अनधिकृतरित्या पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. रात्री सव्वा आठच्या सुमारास कार चालक निशाद शेख (२६) याने पाटील यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली. पाटील यांनी अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने शेख याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. हॉटेल चालक असलेल्या शेख याच्या बचावासाठी आणि याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी एका सपा आमदाराकडून दबाव येत होता. या दबावाला न जुमानता पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेख याला गजाआड केले.
त्यापूर्वी दारुच्या नशेत सांताक्रुझमधील रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या पांडुरंग बारकू दाखरे (३४) याने विले पार्ले पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अशोक सोनावणे (५३) यांना शिविगाळ करत मारहाण केली. सोनावणे यांनी त्याला रुग्णालयात नेले, तसेच पोलीस ठाण्यात आणले असता तेथेही दाखरे याने धिंगाणा घालून तोडफोड केली. गुरूवारी रात्री दोन वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यत हा धिंगाणा सुरू होता. अखेर गुन्हा दाखल करून दाखरे याला पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)
धडकेत पोलीस जखमी
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ रुग्णालयासमोर गोरेगाव पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे समीर भोगवेकर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाहतूकीचे नियोजन करत होते. याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराला त्यांनी अडविले. याच वेळी सुसाट सुटलेला दुचाकीस्वाराचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो भोगवेकर यांना धडक देत खाली कोसळला. या अपघातात भोगवेकरही जखमी झाले.