राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्षप्रवेशाचीही रंगू लागली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 09:25 IST2025-02-07T09:24:46+5:302025-02-07T09:25:23+5:30

महाराष्ट्रात पक्षफुटीचा दुसरा अंक पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Another political earthquake in the state 6 MPs of Uddhav Thackeray shiv sena in contact with eknath Shinde | राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्षप्रवेशाचीही रंगू लागली चर्चा

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्षप्रवेशाचीही रंगू लागली चर्चा

Shiv Sena Uddhav Thackeray: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण उदयास आले. विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे पुढील पाच वर्षांसाठी कायम राहतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पक्षफुटीचा दुसरा अंक पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊपैकी सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल, असं सांगितलं जात आहे. सहा खासदारांनी पक्षांतराची तयारी दर्शवल्याने पक्षांतरबंदी कायद्याबाबतची अडचणही निर्माण होणार नाही, असा दावा केला जात आहे. मात्र हे सहा खासदार नेमके कोण, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, ठाकरेंचे खासदार खरंच एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करतात की केवळ वातावरणनिर्मितीसाठी असे दावे शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जात आहेत, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच राजकीय भूकंपाचा दावा केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी यावर भाष्य केलं आहे. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. टप्प्या-टप्प्याने त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल. उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं नेतृत्व अधिक संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात आलं आहे. मात्र आमच्या संपर्कात असलेले खासदार कोण, हे आताच सांगता येणार नाही. कारण कोणतंही ऑपरेशन राबवताना त्याबद्दल आधीच माहिती दिली जात नाही," असं सामंत यांनी म्हटलं आहे.

Web Title: Another political earthquake in the state 6 MPs of Uddhav Thackeray shiv sena in contact with eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.